Wednesday, 1 August 2012

जिहाद


एखाद्या ध्‍येयाच्‍या सिध्‍दीसाठी आपली संपूर्ण शक्‍ती पणाला लावणे व जिवाच्‍या आकांताने प्रयत्‍न करणे म्‍हणजे 'जिहाद ' होय.  'जिहाद' म्‍हणजे केवळ धर्मयुध्‍द नव्‍हे.  जी व्‍यक्‍ती सदा-सर्वकाळ आपल्‍या ध्‍येयाच्‍या धुंदीत  मग्‍न असते, आपले धन, आपली वाणी आणि आपली लेखणी आदींनी ध्‍येयाच्‍या पूर्ततेसाठी प्रयत्‍नशील असते व त्‍यासाठी स्‍वतःला शीणवत असते, ती वास्‍तवात 'जिहाद'च करत असते.

हुसेन जमादार यांच्‍या आत्‍मचरित्राची सुरवात या कुराणातील वचनाने होते.  हुसेन जमादार यांचे आयुष्‍यही सर्वार्थाने जिहादच म्‍हणावा लागेल.  पण हा जिहाद आपल्‍याच समाजातील दृष्‍ट चालीरी‍ती नष्‍ट व्‍हाव्‍यात, आपल्‍या समाजातील स्‍त्रीयांना त्‍यांचे न्‍याय हक्‍क मिळावे यासाठी आहे.

हुसेन जमादार यांच्‍या आयुष्‍याची जडणघडण आणि मुस्लिम सत्‍यशोधक समाजाचा कार्यकर्ता म्‍हणून त्‍यांना आलेल्‍या अनुभवाचं एक प्रामाणीक चित्रण यात आहे.  सनातनी मुस्‍लीम समाजात विवाहानंतर अल्‍पावधीतच वैधव्‍य प्राप्‍त झाल्‍यानंतर माहेरी आल्‍यानंतर पुनर्विवाह न झाल्‍यामुळे वाट चुकलेल्‍या आईची चूक निस्‍तरण्‍यासाठी तिच्‍या वडिलांच्‍या वयाच्‍या माणसाशी लग्‍न लावून देण्‍यात येतं.  माणूस भला असतो.  घोड्यावरून शहरातून वाण सामान आणून खेडोपाडी ते विकण्‍याचा त्‍याचा उद्योग. शिक्षण नाही.  कालांतराने धंदा बसतो,  मग कुठे टांगा चालव,  कोंबड्या पाळ,  काही काम नसल्‍यास स्‍वस्‍थ बसून रहाणं.  
आणि अगदीच असह्य झाल्‍यास गावी चार सहा महिन्‍यांसाठी निघून जाणं.   आई आणि मोठ्या बहिणी लोकांची धुणी-भांडी करत असत.  

हुसेन जमादार अशा वातावरणात लहानाचे मोठे होतात,  पैशांसाठी हॉटेलातील पो-याचे काम कर,  तर कधी सोडा लेमच्‍या गाडीवर काम करत तर कधी सिनेमाची तिकिटे ब्‍लॅकने विक असे उद्योग करून शाळाही शिकत असतात.  प्रसंगी शाळेलाही चाट देणे चालू  असते पण पुढे शिक्षणाची गोडी लागल्‍यावर कसंही करून शिक्षण पूर्ण करणे हा  ध्‍यास बनतो.  त्‍यांच्‍या जमातीमध्‍ये कोणी एसएससी पर्यंतच शिक्षणही खूप मानलं जायचं.  एसएससी नंतर सेवानियोजन केंद्रात अर्ज भरल्‍यावर नोक-यांचे कॉलही येतात पण घरापासून लांब नोकरी म्‍हणून तीथे जाण्‍यास विरोध होतो.  एका बोहरी शेठकडे त्‍याच्‍या फॅक्‍टरीमध्‍ये हिशेबनीस म्‍हणून नोकरी मिळते.  तिथे त्‍यांची पहिली ओळख होते मुस्लिम सनातन्‍यांशी.  त्‍यांच्‍या बरोबर इज्‍तेमामध्‍ये जाता जाता खरा इस्‍लाम काय आहे,  आपल्‍या लोकांची अशी परिस्थिती  अशी का आहे,  काय केले म्‍हणजे त्‍यात सुधारणा होईल या आणि अशा अनेक विचारांचं काहूर मनात माजतं.  अशाच वेळी त्‍यांची ओळख मुस्लिम सत्‍यशोधक समाजाच्‍या हमीद दलवाई यांच्‍याशी ओळख होते.  इतकच काय, त्‍यांचा अंतरंग सहकारी म्‍हणून काम करण्‍याची संधीही मिळते.  

हे काम करत असतांना शिक्षणही सुरूच असंतं.  हमीद दलवाई त्‍यांना पूर्णवेळ कार्यकर्ता म्‍हणून त्‍यांच्‍या बरोबर काम करण्‍याची संधी देतात.  त्‍याचप्रमाणे घरखर्चासाठी दरमहा ठरावीक रक्‍कम देण्‍याचंही वचन देतात.   

हमीद दलवाई यांच्‍या बरोबर मुस्लिम समाजातील तलाकपीडित महिलांच्‍या हक्‍कासाठी लढतांना आलेले अनुभव,  शिक्षणाच्‍या अभावी, सारासार विचारबुध्‍दी नसलेल्‍या त्‍यांच्‍याच समाजातील लोकांचा,  मुस्लिम मुल्‍ला मौलवी यांचा प्रखर विरोध सोसूनही आपला लढा चालू ठेवतात.  हमीद दलवाई यांच्‍या निधनानंतर त्‍यांच अगीकृत कार्य स्‍वतःच्‍या खांद्यावर घेतात. तलाक पीडित महिलांच्‍या मुलांसाठी वसतीगृह, तलाक पीडित महिलांसाठी भाजीपोळी विक्रीकेंद्र अशी कामंही करत असतात.  त्‍याचवेळी,  शहाबानो या मुस्लिम स्‍त्रीने पोटगी मिळावी यासाठी केलेल्‍या अर्जावर सर्वोच्‍च न्‍यायालय तिच्‍या बाजूने नीर्णय देतो.  तिला पोटगी मिळावी म्‍हणून निर्णय दिल्‍यानंतर सनातनी मुस्लिमांनी न्‍यायालयाचा निर्णय म्‍हणजे त्‍यांच्‍या धर्मात ढवळाढवळ करणे होय अशी भूमिका घेऊन न्‍यायालयाचा निर्णय रद्द करावा म्‍हणून सरकारवर दबाव आणतात, अशा परिस्थितीत जन जागृती करण्‍यासाठी संपूर्ण राज्‍याचा दौरा,  दौ-यात आलेले अनुभव त्‍यांच्‍यावर झालेली दगडफेक याबाबतही विस्‍ताराने लिहिले आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय कायम रहावा,  कुठलाही कायदा संमत करून सदर हक्‍क डावलला जाऊ नये यासाठी लेखकाची लोकसभा सभापतींपासून, पंतप्रधान, राष्‍ट्पती यांची घेतलेली भेट तिथेही त्‍यांच्‍या वाट्याला आलेली निराशाच येते.  

निराशेच्‍या या वातावरणात हतबल न होता,  अंगीकृत कार्याच्‍या दिशेने हळूहळू का होईना वाटचाल करत जाणा-या जमादार यांचा हा 'जिहाद'  प्रत्‍येक कार्यकर्त्‍याने वाचावयासच हवा.


जिहाद
लेखक हुसेन जमादार 
प्रकाशक मेहता प्रकाशन
किंमत रु दोनशे वीस फक्‍त 

Thursday, 15 December 2011

स वा जोशी विद्यालय, काही आठवणी

               शिशुकुंज या शाळेतून 4 थी उत्‍तीर्ण झाल्‍यावर आठवते की स.वा.जोशी हायस्‍कूल मध्‍ये प्रवेश मिळणे फार कठीण वाटत होते.  त्‍यावेळी झेड पी यांच्‍याकडे जाऊन आपले विद्यार्थ्‍याचे नाव द्यावे लागत असे.  आणि उपलब्‍धतेनुसार शाळेमध्‍ये प्रवेश दिला जात असे.
              अण्‍णा रिझल्‍ट लागल्‍यावर झेडपीच्‍या ऑफीसमध्‍ये जाऊन आले.  घरी आल्‍यावर त्‍यांनी सांगितले की तुला महात्‍मा गांधी विद्यालयात प्रवेश मिळेल (कदाचीत ते माझी गंमत करण्‍याच्‍या दृष्‍टीने म्‍हणाले असावे) ते ऐकून माझा चेहरा एकदम उतरला.
              पण दोन दिवसांनी त्‍यांनी मला सांगितले की तुला 5 वी मध्‍ये स वा जोशी मध्‍ये प्रवेश मिळाला आहे.  तुकडी ब.  ऐकून इतका आनंद झाला की काही विचारू नका ! पण मनात विचार होता की शिशुकुंजच्‍या माझ्या सर्व मित्रांना प्रवेश मिळाला असेल ना स वा जोशी मध्‍ये.
             शाळेचा पहिला दिवस उजाडला.  स.वा.जोशी विद्यालय सर्वार्थाने निराळे होते.  शिशुकुंज शाळा मोठ्या बाई  म्‍हणजे समेळ बाईंची शाळा म्‍हणून ओळखली जायची.  बसायला सतरंज्‍या पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी हे चार वर्ग आणि छोटा शिशु आणि मोठा शिशु अशा दोन वर्गांसाठी एक मोठा हॉल अशी रचना.  स.वा.जोशीचा डौल वेगळाच सकाळ आणि दुपार असे दोन सत्र.  माझी रवानगी सकाळच्‍या सत्रामध्‍ये झाली होती.  शाळेत अगदी ग, फ पर्यंत तुकड्या एकेका वर्गामध्‍ये 48 ते 55 पर्यंत पटसंख्‍या.  आणि बसायला बाक किंवा बेंचेस.
               पहिल्‍या दिवशी आमचे क्‍लास‍ टिचर यादव सर आहेत असे समजले.  ते आम्‍हाला गणित विषय शिकवणार होते.  माझ्या शेजारी माझा मित्र सुशिल बारेकल बसायचा.  एकेका बेंचवर तीन मुलं.  यादव सर एक मोठे रजिस्‍टर घेऊन आले.  आणि हजेरी झाली.  गोडबोले सर इंग्रजी शिकवायला.  बुटके नॅरो बॉटमची पँट आणी बुशकोट घालून कपाळाला बुक्‍का, गळ्यात माळ त्‍यांनी वर्गात गुडमार्निंग क्‍लास असे म्‍हणून जी एन्‍ट्री घेतली ती आजही स्‍मरणात आहे.  त्‍यांनीच आम्‍हाला भारताची प्रतिज्ञा, इंग्रजीमध्‍ये प्‍लेज शिकवली, उच्‍चारासह, तालात ती कशी म्‍हणायची, आणि विद्यार्थ्‍यांन सांगितलं की जेव्‍हा माझा तास असेल तेव्‍हा आधीचा क्‍लास संपल्‍यावर आणि मी वर्गात यायच्‍या आधी सर्वांनी मोठ्यानी एकस्‍वरात ही प्रतिज्ञा म्‍हणायचे मुलांवर देखरेख ठेवण्‍यासाठी एक दिगंबर नावाचा अनुतीर्ण झालेला विद्यार्थ्‍याला नेमलं होते.  तेव्‍हा गुरुजींची मोठेपण समजत नव्‍हतं पण आता समजत की सर्वांना कसं बरोबर घेऊन जायचं, केवळ हुषार मुलांनाच संधी देऊन चालणार नाही, तर वर्गातील सर्व गुणी, हुषार आणि सर्व साधारण विद्यार्थ्‍यांना एकत्र घेऊन जाणं कीती आवश्‍यक असतं ते.
               गोडबोले सरांनी शिक्षण वर्गाबाहेरही नेलं होतं.  विविध खेळांच्‍या माध्‍यमातून संधी मिळताच ते आम्‍हाला वर्गाबाहेर न्‍यायचे आणि इंग्रजी शिकवायचे.  त्‍यांना तबलाही छान वाजवता यायचा.
                पी.टी. शिकवायला आपटे सर होते.  छपरी मिशा राखलेल्‍या आपटे सरांची आम्‍हा विद्यार्थ्‍यांना फार भीती वाटायची.  चित्रकला शिकवायला साखळकर बाई, शिवण शिकवायला संन्‍याशी बाई होत्‍या.
                यादव सरांनी वर्गात शिकवायला सुरवात करतांना मला भागाकारच एक गणित फळ्यावर लिहिलं होतं.  ते सोडवायला सांगितलं. गणित आणि माझा लहानपणापासूनच छत्‍तीसचा आकडा.  गणित काही सोडवता आलं नाही.  सरांनी मग अरे चौथीतलं साध उदाहरणही सोडवता येत नाही, काय हे असा शेरा मारला..
                आज आठवतं की कोणत्‍याही अधिकारी व्‍यक्‍तीचा एखादाही शेरा अभिप्राय आपल्‍या मनावर किती परिणाम करत असतो ते.
                 आठवणी पुष्‍कळच आहेत.  त्‍या सर्व तुम्‍हाबरोबर शेअर करायच्‍या आहेतच.  आज निमित्‍त्‍य झालं कारण फेसबूकवर वाचलं की आपली शाळा सन 2011 मध्‍ये आपला अमृत महोत्‍सवी वर्षामध्‍ये पदार्पण करीत आहे.  त्‍यासाठी संकेतस्‍थळही बनवलं आहे.  ते आहे www.svj75.com.  तर मित्रांनो या संकेत स्‍थळावर जाऊन सर्व माजी विद्यार्थ्‍यांनी आपली माहिती नोंदवावी आणि शाळेच्‍या उपक्रमामध्‍ये सर्वत-हेने सहभागी व्‍हावे.

Saturday, 22 October 2011

kabir vani

आई कालच चित्रकूट येथून परत आली.  तिने माझ्या साठी कबीरांच्या साखी अनुवाद आणला आहे.  सध्या वाचत आहे.  कबीरांनी अज्ञान, प्रपंच, पाप, छल आणि पाखंड यात अडकून पडलेल्या लोकांना सत्य, सदाचार आणि सहिष्णूता यांचा मार्ग दाखवला.  समाजात साथी सारख्या पसरलेल्या पाखंड, गैर समजुती आणि कुप्रथांवर तीव्र  प्रहार ( कबीर वाणी ) केले आणि समाजात सौर्हार्द, सुख आणि समानता निर्माण होण्यासाठी सतत प्रयत्न केला.  कबीर वाणी आजही अमर आहे कारण त्यात शाश्वत सत्य प्रतिपादित केले आहे.    प्राप्त ज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा आणि समाजाचा विकास कसा करता येईल हे कबिरांचे दोहे वाचून आपल्याला समजते. त्यांचे दोहे आपल्याला कार्यप्रवण करतात.

Tuesday, 23 August 2011

देवनागरी मध्‍ये लेखन

कालच एका संकतेस्‍थळावरून देवनागरीमध्‍ये ब्‍लॉगमध्‍ये किंवा फेसबूकमध्‍ये कसे लिहिता येते याबाबत माहिती करून घेतली.  आता त्‍याच माध्‍यमाद्वारे टंकलेखन करत आहे.  आपले विचार आपल्‍या मातृभाषेतून मांडण्‍यासारखा मोठा आनंद नाही.  

Friday, 19 August 2011

वेळेचा सदुपयोग

 एक शिक्षक वर्गात बदली घेऊन आला. त्यात मोठाले दगड घालायला सुरवात केली. बदली भरली. त्याने विचारले " ही बदली भरली का ?" मुले म्हणाली "हो" मग त्याने छोटे दगड घालायला सुरवात केली. ते मोठ्या दगडांमध्ये जाऊन बसले. मग पुन्हा विचारले " आत्ता ही बदली भरली का ?"विध्यार्थ्यांच्या डोक्यात नेमके उत्तर आले. ते म्हणाले "नाही" मग त्याने वाळू घेतली. मग पाणी. हे करून झाल्यावर तो म्हणाला, " तुम्हाला काय बोध झाला ? तर दोन मोठ्या कामांच्या मध्ये जागा असते. त्यात तुम्ही छोटी कामे उरकू शकता." मग त्यांना उलट्या क्रमाने सुरवात केली. बादलीत आधी वाळू, मग छोटे दगड भरले. त्यानंतर मोठ्या दगडांना जागा उरली नाही. त्यातून काय बोध घ्यायचा ? तर तुम्ही छोटी कामेच सतत करत राहिलात, तर मोठ्या कामाना कधी वेळच मिळणार नाही.