एखाद्या ध्येयाच्या सिध्दीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे 'जिहाद ' होय. 'जिहाद' म्हणजे केवळ धर्मयुध्द नव्हे. जी व्यक्ती सदा-सर्वकाळ आपल्या ध्येयाच्या धुंदीत मग्न असते, आपले धन, आपली वाणी आणि आपली लेखणी आदींनी ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील असते व त्यासाठी स्वतःला शीणवत असते, ती वास्तवात 'जिहाद'च करत असते.
हुसेन जमादार यांच्या आत्मचरित्राची सुरवात या कुराणातील वचनाने होते. हुसेन जमादार यांचे आयुष्यही सर्वार्थाने जिहादच म्हणावा लागेल. पण हा जिहाद आपल्याच समाजातील दृष्ट चालीरीती नष्ट व्हाव्यात, आपल्या समाजातील स्त्रीयांना त्यांचे न्याय हक्क मिळावे यासाठी आहे.
हुसेन जमादार यांच्या आयुष्याची जडणघडण आणि मुस्लिम सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना आलेल्या अनुभवाचं एक प्रामाणीक चित्रण यात आहे. सनातनी मुस्लीम समाजात विवाहानंतर अल्पावधीतच वैधव्य प्राप्त झाल्यानंतर माहेरी आल्यानंतर पुनर्विवाह न झाल्यामुळे वाट चुकलेल्या आईची चूक निस्तरण्यासाठी तिच्या वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न लावून देण्यात येतं. माणूस भला असतो. घोड्यावरून शहरातून वाण सामान आणून खेडोपाडी ते विकण्याचा त्याचा उद्योग. शिक्षण नाही. कालांतराने धंदा बसतो, मग कुठे टांगा चालव, कोंबड्या पाळ, काही काम नसल्यास स्वस्थ बसून रहाणं.
आणि अगदीच असह्य झाल्यास गावी चार सहा महिन्यांसाठी निघून जाणं. आई आणि मोठ्या बहिणी लोकांची धुणी-भांडी करत असत.
हुसेन जमादार अशा वातावरणात लहानाचे मोठे होतात, पैशांसाठी हॉटेलातील पो-याचे काम कर, तर कधी सोडा लेमच्या गाडीवर काम करत तर कधी सिनेमाची तिकिटे ब्लॅकने विक असे उद्योग करून शाळाही शिकत असतात. प्रसंगी शाळेलाही चाट देणे चालू असते पण पुढे शिक्षणाची गोडी लागल्यावर कसंही करून शिक्षण पूर्ण करणे हा ध्यास बनतो. त्यांच्या जमातीमध्ये कोणी एसएससी पर्यंतच शिक्षणही खूप मानलं जायचं. एसएससी नंतर सेवानियोजन केंद्रात अर्ज भरल्यावर नोक-यांचे कॉलही येतात पण घरापासून लांब नोकरी म्हणून तीथे जाण्यास विरोध होतो. एका बोहरी शेठकडे त्याच्या फॅक्टरीमध्ये हिशेबनीस म्हणून नोकरी मिळते. तिथे त्यांची पहिली ओळख होते मुस्लिम सनातन्यांशी. त्यांच्या बरोबर इज्तेमामध्ये जाता जाता खरा इस्लाम काय आहे, आपल्या लोकांची अशी परिस्थिती अशी का आहे, काय केले म्हणजे त्यात सुधारणा होईल या आणि अशा अनेक विचारांचं काहूर मनात माजतं. अशाच वेळी त्यांची ओळख मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या हमीद दलवाई यांच्याशी ओळख होते. इतकच काय, त्यांचा अंतरंग सहकारी म्हणून काम करण्याची संधीही मिळते.
हे काम करत असतांना शिक्षणही सुरूच असंतं. हमीद दलवाई त्यांना पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी देतात. त्याचप्रमाणे घरखर्चासाठी दरमहा ठरावीक रक्कम देण्याचंही वचन देतात.
हमीद दलवाई यांच्या बरोबर मुस्लिम समाजातील तलाकपीडित महिलांच्या हक्कासाठी लढतांना आलेले अनुभव, शिक्षणाच्या अभावी, सारासार विचारबुध्दी नसलेल्या त्यांच्याच समाजातील लोकांचा, मुस्लिम मुल्ला मौलवी यांचा प्रखर विरोध सोसूनही आपला लढा चालू ठेवतात. हमीद दलवाई यांच्या निधनानंतर त्यांच अगीकृत कार्य स्वतःच्या खांद्यावर घेतात. तलाक पीडित महिलांच्या मुलांसाठी वसतीगृह, तलाक पीडित महिलांसाठी भाजीपोळी विक्रीकेंद्र अशी कामंही करत असतात. त्याचवेळी, शहाबानो या मुस्लिम स्त्रीने पोटगी मिळावी यासाठी केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालय तिच्या बाजूने नीर्णय देतो. तिला पोटगी मिळावी म्हणून निर्णय दिल्यानंतर सनातनी मुस्लिमांनी न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यांच्या धर्मात ढवळाढवळ करणे होय अशी भूमिका घेऊन न्यायालयाचा निर्णय रद्द करावा म्हणून सरकारवर दबाव आणतात, अशा परिस्थितीत जन जागृती करण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा, दौ-यात आलेले अनुभव त्यांच्यावर झालेली दगडफेक याबाबतही विस्ताराने लिहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम रहावा, कुठलाही कायदा संमत करून सदर हक्क डावलला जाऊ नये यासाठी लेखकाची लोकसभा सभापतींपासून, पंतप्रधान, राष्ट्पती यांची घेतलेली भेट तिथेही त्यांच्या वाट्याला आलेली निराशाच येते.
निराशेच्या या वातावरणात हतबल न होता, अंगीकृत कार्याच्या दिशेने हळूहळू का होईना वाटचाल करत जाणा-या जमादार यांचा हा 'जिहाद' प्रत्येक कार्यकर्त्याने वाचावयासच हवा.
जिहाद
लेखक हुसेन जमादार
प्रकाशक मेहता प्रकाशन
किंमत रु दोनशे वीस फक्त
No comments:
Post a Comment